मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी राज ठाकरे पोहोचले ‘वर्षा’ बंगल्यावर .

Share the news
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी राज ठाकरे पोहोचले  ‘वर्षा’ बंगल्यावर .

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी ही भेट झाली. आरोग्य विषयावर चर्चा करण्यासाठी या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीला राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री तानाजी सावंत तसंच महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा हे देखील उपस्थित होते. 

 
राज ठाकरे आज दुपारी साडेतीनच्या सुमारास मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर पोहोचले. राज ठाकरे अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर पोहोचल्याने राजकीय वर्तुळातील चर्चांना उधाण आलं आहे. दोघांमध्ये जवळपास दीड तास बैठक झाली. आरोग्यविषयक मुद्दे हे भेटीचं प्रमुख कारण असलं तरी यात राजकीय चर्चा होण्याचीही शक्यता आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीबाबतही राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे. या पोटनिवडणुकीत मनसे भाजप आणि शिंदे गटाच्या युतीला पाठिंबा देणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 
 
अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी एकनाथ शिंदे गटानं उमेदवार दिलेला नसला तरी भाजपाचे उमेदवार निवडणून आणण्यासाठी शिंदे गटाकडून प्रयत्न केले जात आहेत. यात मनसेचाही पाठिंबा मिळवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रयत्न करत आहेत का? अशी चर्चा सुरू झाली आहे. वर्षा बंगल्यावरील या भेटीला एकनाथ शिंदे, राज ठाकरे यांच्यासोबतच भाजपचे नेते मंगलप्रभात लोढा देखील उपस्थित आहेत. त्यामुळे त्यांच्यात राजकीय चर्चा होणार हे साहजिक आहेत. गेल्या दोन महिन्यात राज ठाकरे यांनी तीन वेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. राज ठाकरे याआधी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्याच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आले होते. तर त्याआधी एकनाथ शिंदे यांनी शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *